बंगळुरू - कर्नाटकात मंत्र्यांसह आमदारांनी राजीनामे दिल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. अनेक आमदारांनी लेखी राजीनामे विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांना पाठवले आहेत. परंतु, रमेशकुमार यांनी नियमानुसार सर्वकाही करत असल्याचे सांगत ८ आमदारांचे राजीनामे नामंजुर केले आहेत. यामुळे बंडखोर आमदारांसमोर नवीन समस्या निर्माण झाला आहे.
आमदारांच्या राजीनाम्याबाबत रमेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटले, १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांपैकी फक्त ५ आमदारांचे राजीनामे वैध आहेत. मी घटनेनुसार काम करत आहे. ६ जुलैला १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत मी कार्यालयात उपस्थित होतो. परंतु, त्यावेळी मला कोणीही दिसले नाही. मी गेल्यानंतर १३ आमदारांनी कार्यालयात राजीनामे जमा केले. यापैकी ८ आमदारांचे राजीनामे नियमानुसार नाहीत. आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे. यासोबत त्यांना भेटण्यासाठी वेळही दिला आहे. तर, ५ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावर कारवाई सुरू आहे.
काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कर्नाटकचे विद्यमान सरकार अडचणीत सापडले आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे नेते सरकार टिकवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु. बंडखोर आमदारही राजीनामा देण्यावर ठाम आहेत. आता विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे मंजुर केल्यामुळे ८ आमदारांसमोर पेच निर्माण झाला आहे.