बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाने काल (बुधवार) वादग्रस्त स्वयंघोषित स्वामी नित्यानंद याचा जामीन रद्द केला आहे. 2010 ला दोन मुलींनी अपहरण करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. त्याप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर तो भारतामधून फरार झाला होता.
नित्यानंदचा चालक म्हणून काम केलेल्या कुरूप्पन लेनिन या व्यक्तीने सर्वप्रथम पोलिसांमध्ये नित्यानंदविरोधात तक्रार दाखल केली होती. नित्यानंद हा वारंवार सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याचे सांगत लेनिन यांनीच उच्च न्यायालयात त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देत, न्यायमूर्ती जॉन मायकल डीकुन्हा यांनी नित्यानंदचा जामीन रद्द करत, ट्रायल कोर्टला त्याच्या अटकेचे आदेश देण्यास सांगितले. तसेच, नित्यानंदचे हमीपत्र आणि बाँड्स जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
दरम्यान, नित्यानंद याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय पोलीस महामंडळ, म्हणजेच 'इंटरपोल'ने 'ब्लू नोटीस' जारी केली आहे. गुजरात पोलिसांची मागणी मान्य करत त्यांनी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. स्वामी नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असे आहे. मूळ तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या राजशेखरनने गुजरात येथे आश्रम सुरू केला होता. याठिकाणीच मुलींचे लैंगिक शोषण, तसेच अत्याचार करून, त्याची सीडी बनवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. सध्याच्या माहितीनुसार, नित्यानंद याने गेल्यावर्षी नेपाळमार्गे भारतातून पळ काढला होता. यानंतर त्याने इक्वेडोर देशात आश्रय मिळवून तेथे स्वतःचे ‘सार्वभौम हिंदू राष्ट्र’स्थापन केले आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या देशाला त्याने 'कैलास' असे नाव दिल्याचेही समोर आले होते.
हेही वाचा : स्वामी नित्यानंदविरोधात इंटरपोलने जारी केली 'ब्लू नोटीस'