बंगळुरू - कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने पुन्हा एकदा जग हादरलं आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने नववर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नाईट कर्फ्यूची घोषणा केली होती. २४ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ५ या वेळात नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध होते. मात्र, सरकारने हा निर्णय फिरवला असून नाईट कर्फ्यू रद्द केला आहे.
संचारबंदीसाठी जारी केली होती नियमावली -
बुधवारी सरकारने रात्रीच्या संचारबंदीची नियमावली जारी केली होती. नागरिकांच्या हालचलींवर अनेक बंधने घालण्यात आली होती. या नियमास काही अपवादही होते. मात्र, येडीयुरप्पा सरकारने २४ तासांच्या आत हा निर्णय रद्द केला. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि ख्रिसमससाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे.
व्यावसायिकांनी आणला दबाव -
अनेक मंत्र्यांनी, हॉटेल, रेस्तराँ, बारचालकांसह व्यावसायिकांनी नाईट कर्फ्यूचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला होता. कारण, नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना मोठा तोटा सहन करावा लागला असता, अशी माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे. अनेकांनी सरकारच्या या निर्णयाला अविचारी असे म्हटले होते. त्यामुळे सरकारने निर्णय बदलला.