बंगळुरू : कर्नाटकच्या हसन जिल्ह्यामध्ये बॉलिवूडपटामध्ये शोभेल अशी घटना घडली आहे. चार तोतया पोलिसांनी एका घरावर छापा टाकत, पैसे आणि दागिन्यांसह पोबारा केला.
जिल्ह्यातील होसूर गावात राहणाऱ्या लावन्ना गौडा यांच्या घरी ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्टला गौडा यांच्या घरी चार पोलीस आले. तुमच्या भावाने बंगळुरूमध्ये एका घरात चोरी केली आहे, आणि तो इथे लपून बसला आहे असे या पोलिसांनी गौडांना सांगितले. त्या भावाचा शोध घेण्यासाठी आम्ही घरावर छापा टाकत आहोत, असे म्हणत त्यांनी घरातील पैसे, सोने सगळं जप्त केले.
त्यानंतर हे सगळे साहित्य तपासणीसाठी घेऊन जात असल्याचे सांगत, त्या चौघांनी तेथून पळ काढला. त्यानंतर या कुटुंबाला आपण फसलो गेल्याचे लक्षात आले, आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठत या चौघांविरोधात तक्रार नोंदवली.
यानंतर पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.