नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला जागा देण्यात आलेली नाही. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत जागांच्या वाटाघाटींमध्ये कन्हैया कुमारला तिकिट देण्यासंबंधीचा निर्णय सध्या बाजूला ठेवण्यात आल्याचे चित्र आहे.
'भाकपने आगामी निवडणुकांमध्ये २४ राज्यांमध्ये ५३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे,' असे पक्षातर्फे सांगितले आहे.
भाकप नेते डी. राजा यांनी 'राजद'सोबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले. तसेच, बोलणी पूर्ण झाल्यानंतर कन्हैया कुमारबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. त्यानंतरच निर्णय होईल, असे ते म्हणाले. तसेच, राजदने त्यांना प्रतिसाद न दिल्यास त्यांचा पक्ष वेगळा विचार करेल, असे संकेतही त्यांनी दिले. भाकपने कन्हैयासाठी बेगुसरायची जागा मागितली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनुसार, राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला जागा देण्याच्या विरोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. कन्हैया कुमार भूमिहार जातीच्या समाजातील असून हा समाज राजदला मतदान करत नसल्याचे लालू प्रसाद यांचे म्हणणे आहे.