नवी दिल्ली - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शुक्रवारी भरदिवसा हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांने तिवारी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून चाकू बाहेर काढला आणि गळा कापून त्यांना ठार मारले आहे. दरम्यान आरोपी सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाले आहेत. दोन आरोपींपैकी एकाने भगवा रंगाचा कुर्ता घातलेला आहे. तर, दुसर्याच्या डोक्यावर टोपी आहे.
कमलेश तिवारी यांचा सेवक स्वराष्ट्रजीत सिंह यांनी माध्यमांशी चर्चा करून पुर्ण घटनेची माहिती दिली आहे. कार्यालयात येण्यापूर्वी हल्लेखोर तिवारी यांच्याशी १० मिनिटे फोनवर बोलल्यानंतर हल्लेखोर कार्यालयात आले. जेव्हा हल्लेखोर कार्यालयात आले. त्यावेळी सुरक्षा रक्षक झोपलेला होता.
दोन्ही हल्लेखोर थेट कमलेश तिवारी यांना भेटायला गेले. त्यांनी तिवारी यांच्याशी जवळपास अर्धा तास संवाद साधला. संभाषणादरम्यान कमलेश तिवारी यांनी दोघांनाही चहा पाजला. यावेळी त्यांनी सेवकाला मसाला आणि सिगारेट आण्यासाठी पाठवले. तो परत येईपर्यंत हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते.
कमलेश तिवारी कोण होते?
हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये हिंदु समाज पक्षाची स्थापना केली. तिवारी यापूर्वी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कमलेश तिवारी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्याविरूद्ध एनएसए रद्द केले होते.