ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) - बिहारमध्ये विधानसभा निवडणूक तर मध्य प्रदेशात २८ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या रणधुमाळीत अनेक दिग्गज नेत्यांची जीभ घसरते. असाच प्रत्यय भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या एका सभेमध्ये आला. त्यांनी चक्क काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले. भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेसाठी ज्योतिरादित्य सिंधिया डबरामध्ये आले होते. भाषणाच्या ओघात त्यांना आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात आल्याचा विसर पडला आणि कमळाचे बटण दाबा, असे सांगण्याऐवजी काँग्रेसच्या 'हात' या निशाणीसमोरील बटण दाबण्याचे आवाहन केले.
व्हायरल व्हिडीओची ईटीव्हीकडून पुष्टी नाही
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तथापि, या व्हायरल व्हिडीओची पुष्टी ईटीव्ही करत नाही.
प्राण्यांची जंत्री
याआधी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही सभांमध्ये स्वत:लाच विविध प्राण्यांची उपमा दिली आहे. अशोकनगरच्या शाडोर येथे झालेल्या जाहीर सभेत सिंधिया यांनी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर पलटवार केला होता. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी थेट कोणाचेही नाव न घेता 'श्वान' असा उल्लेख केला होता. 'होय, मी श्वान आहे. श्वान आपला मालक आणि दात्याची रक्षा करतो. जो सत्तेचा गैरवापर करेल, त्याचा चावा देखील घेईल,' असे प्रत्युत्तर सिंधिया यांनी दिले होते. त्यांनी स्वत:चा उल्लेख 'कावळा' असाही केला होता. तत्पुर्वी, २ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सिंधिया यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. गेले दोन महिने चरित्रहनन केले जात आहे; पण मी एवढेच म्हणेन की, 'टायगर अभी जिंदा है', असे ते म्हणाले होते.