नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक पातळीवरील बहुप्रतिभाशाली व्यक्तीमत्व असल्याचे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांनी केले आहे. तसेच मोदी हे दूरदृष्टी असलेले, जागतिक पातळीवर विचार करणारे परंतु, स्थानिक पातळीवर कार्यरत असणारे नेते आहेत, असे ते म्हणाले.
यानंतर मिश्रा यांनी पंतप्रधान तसेच केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी १५०० अप्रचलित कायदे रद्द केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच जागतिक पातळीवर मोदींच्या नेतृत्तवात भारताची गणाना सर्वात मैत्रीपूर्ण देशांमध्ये होत असल्याचे जस्टीस मिश्रा यांनी सांगितले.
इंटरनॅशनल ज्युडिशियन कॉन्फरन्स- २०२० मध्ये न्यायालयीन व्यवस्था आणि बदलते जग या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलताना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायव्यवस्था सारख्याच प्रकारच्या समस्यांना तोंड देत असल्याचे ते म्हणाले. बदलत्या जगात न्यायव्यवस्थेने लक्षणीय भूमिका निभावली आहे. या भूमिकेमुळे मानवी मूल्यांना कायम प्रतिष्ठा लाभली.
उद्घाटन कार्यक्रमावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीबद्दल वक्तव्य करताना त्यांनी पंतप्रधानांना उत्प्रेरकाची उपमा दिली.
भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असून जागतिक समुदायात देशाचे सर्वत्र मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे सर्व नरेंद्र मोदींसारख्या द्रष्ट्या नेतृत्त्वामुळे शक्य झाल्याचे ते म्हणाले. भाषणादरम्यान त्यांनी जागतिकीकरण, सुदृढ न्यायव्यवस्था, दहशवादमुक्त वातावरण तसेच पर्यावरण संवर्धनावर भाष्य केले.