गाझियाबाद(उत्तर प्रदेश)- शहरातील विनय नगर परिसरात गोळीबारात जखमी झालेल्या पत्रकार विक्रम जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जोशी यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते जखमी झाले होते.
पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर सोमवारी रात्री काही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या प्रकरणी नऊ आरोपींना पकडले असून मुख्य आरोपीचे नाव रवी आहे. छोटू, मोहित, दलवीर, आकाश उर्फ लुल्ली, योगेंद्र, अभिषेक हकला, अभिषेक मोटा आणि शकीर अशी इतर आरोपींची नावे आहेत. अशोक नावाच्या आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या आरोपींविरुद्ध विक्रम जोशी यांनी तक्रार दाखल केली होती. ते सर्वजण जोशी यांच्या भाचीला त्रास देत होते. हल्लेखोरांनी जोशी यांच्या घराजवळच गोळीबार केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यावेळी जोशी यांची मुलगी त्यांच्यासोबत होती.
जोशी यांनी तक्रार देऊनही पोलिसांनी दखल न घेतल्याने गोळीबार झाला, असा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला आहे. यानंतर पोलीस स्टेशन प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे. काही समाजकंटक विक्रम जोशी यांच्या भाचीला त्रास देत होते. याविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती,असे त्यांचा भाऊ अनिकेत जोशी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणानिमित्त उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली आहे.