जयपूर - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आयआयटी जोधपूर सातत्याने नवनवीन शोध लावण्यात व्यग्र आहे. एन95 मास्कचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान, शील्ड मास्क आणि सॅनिटायझर तयार करण्याबरोबर आता आयआयटी जोधपुरने टेलिमेडिसन पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलमार्फत नागरिक घरी बसल्या डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात.
या ऑनलाईन पोर्टलशी जोधपूर सोडून इतर शहरांतील डॉक्टरही जोडले जात आहेत. संपूर्ण भारतासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलची भाषा हिंदी असून हे मोबाईलवरही सहजरित्या वापरण्यात येते. एक महिन्यात हे अॅप गुगल प्ले-स्टोअरवरही येणार आहे. असिस्टंट प्रोफेसर डॉ. सुमित कालरा यांच्या मार्गदर्शनाखाली कुनाल नावाच्या विद्यार्थ्याने हे अॅप विकसित केले आहे. प्रो. कालरा यांच्या पत्नी एम्स रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे रुग्णांना होणारा त्रास त्यांनी सांगितल्यानंतर सुमित यांना ही कल्पना सुचली.
काय आहे टेलिमेडिसीन पोर्टलवर?
या पोेर्टलद्वारे डॉक्टरांशी ऑनलाईन चॅट करण्याची सुविधा आहे. तसेच व्हिडिओ कॉलिंगद्वारे कन्सल्टिंग करण्याचीही सुविधा आहे. जोधपूरसह पंजाब, उत्तर प्रदेश येथील डॉक्टरही या पोर्टलशी जोडले गेले आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडील रजिस्ट्रेशन दाखविल्यानंतरच डॉक्टरांना या अॅपवर रजिस्टर होता येते. लॉकडाऊनमुळे अनेक जण घरामध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे ऑनलाईन डॉक्टारांकडून मार्गदर्शन मिळणे सोपे झाले आहे.