देहरादून - जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये IED ब्लास्टमध्ये हुतात्मा झालेल्या देहरादूनच्या मेजर चित्रेश बिश्त यांना आज लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. हरिद्वार येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. उपस्थितांनी 'अमर रहे' अशा घोषणांमध्ये साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचीही यावेळी उपस्थिती होती.
मेजर बिश्त यांचे पार्थिव रविवारी सकाळी साडेअकरा वाजता जॉलीग्रांट विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर त्यांना गढी कँट लष्करी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव नेहरू कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी पोलीस इन्स्पेक्टर एस. एस. बिश्त यांचे धाकटे पुत्र चित्रेश बिश्त यांना शनिवारी नौसेरा सेक्टरमध्ये वीरमरण आले. नियंत्रण रेषेजवळ स्फोटकांच्या शोध अभियानादरम्यान त्यांना नियंत्रण रेषेपासून सुमारे दीड किलोमीटरवर आयईडी (इम्प्रोवाईज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस) बॉम्ब लावल्याची माहिती मिळाली. यानंतर सैन्य सतर्क होऊन बॉम्ब निकामी करण्यास सुरुवात झाली. यादरम्यान स्फोट होऊन मेजर बिश्त यांना वीरमरण आले.
मेजर बिश्त यांची इंजिनिअरिंग विभागात ५५ जीआरमध्ये नेमणूक केली होती. चित्रेश यांनी २०१० मध्ये आयएमए (भारतीय सैन्य अकादमी) डेहराडून येथून पासआउट झाले होते. चित्रेश सात मार्चला विवाहबद्ध होणार होते. ते साखरपुड्यानंतर ३ फेब्रुवारीला ड्युटीवर आले होते. यानंतर २८ फेब्रुवारीला लग्नासाठी सुट्टी घेऊन घरी जाणार होते.