रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतःला गृह-विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची भेट घेतलेल्या एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
राज्याचे स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकूर यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर सोरेन यांनी स्वतः विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनाही त्यांनी विलगीकरणात जाण्याचे आवाहन केले आहे.
ठाकूर यांच्यासह झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार मथुरा महातो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांनाही 'राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (आरायएमएस) मधील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासोबतच, सोरेन यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे, ज्यांचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
झारखंडमध्ये मंगळवार रात्रीपर्यंत कोरोनाच्या ३,०१८ रुग्णांची नोंद झाली असून, यांपैकी ८९२ अॅक्टिव रुग्ण आहेत. तसेच, राज्यात आतापर्यंत २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटला विकास दुबे; तीन साथीदार ताब्यात..