रांची - मागच्याच महिन्यात दहशतवादी मसूद अजहरला 'जी' म्हटल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपने टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीच मसूदला जी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी एका जनसभेमध्ये मसूद अजहरला जी म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. एवढेच नाही तर भाजपने आपल्या प्रत्येक जनसभेमध्ये त्यांना धारेवर धरले होते. मात्र, आता भाजपच गोत्यात पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
केंद्रीय उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा शनिवारी रामगड येथे एका जनसभेला संबोधित करत होते. त्यावेळी मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यावरुन ते सरकारचे कौतुक करत होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून मसूद अजहरजीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले, असे म्हटले. त्यांचा हा व्हिडिओ तेथे उपस्थित कार्यकर्त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या वक्तव्यानंतर भाजप त्यांच्या विरोधात काय पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. राहुल गांधी यांच्या सारखेच विविध भागातून त्यांच्यावर तक्रारी दाखल होतील का हेही पाहण्यासारखे आहे.