लखनऊ (उत्तर प्रदेश) - मंगळवारी समाजवादी पार्टीने 3 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या यादीत राज्यसभा खासदार जया बच्चन यांचे नावच नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जया बच्चन यांनी बॉलीवूडसंबंधी राज्यसभेत आपले मत मांडले होते. तेव्हापासून पक्षांतर्गत गोष्टींपासून त्यांना दूर ठेवण्यात येते आहे आणि त्याचेच हे संकेत आहेत, असे मानले जात आहे. बॉलिवूडची प्रतिमा खराब करण्याऱ्या भाजपाचे खासदार आणि अभिनेते रवी किशन यांच्यावर बच्चन यांनी टीका केली होती.
पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचा समावेश आहे. ते सध्या कोविड पॉझिटिव्ह असून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, तुरुंगात असलेल्या मोहम्मद आझम खान यांचाही या यादीत समावेश आहे.
याव्यतिरिक्त सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, किरणमय नंदा, पार्टीचे सरचिटणीस राम गोपाल यादव, इंदरजीत सरोज, राज्याचे विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी आणि राज्याध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांचा स्टार प्रचारकांचा यादीत समावेश आहे.