टोकियो – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये आणखी १४ देशांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जपानचे मुख्यमंत्री शिंझो अबे यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केला. यामध्ये रशिया, पेरू आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांचाही समावेश आहे.
जपानने याअगोदरही ७० पेक्षा अधिक देशांना प्रवेशबंदी केली आहे. आता यामध्ये आणखी १४ देशांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रवेश बंदी आणि व्हिझाचे नियम हे ३० एप्रिलपर्यंत लागू करण्यात आले होते. आता हे नियम मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
जपान सध्या ६ मे पर्यंत आणीबाणीच्या स्थितीत आहे. तेथील अधिकारी सध्या या आणीबाणीच्या होणाऱ्या परिणामांवर उपाय शोधत आहेत.
जपानमध्ये आत्तापर्यंत १३ हजार ३८५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ७१२ जणांना टोकियो जवळील क्रुझ शिपवर क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. तर, आत्तापर्यंत ३६४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.