श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात लष्कराच्या एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरला (जेसीओ) वीरमरण प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये ही घटना घडल्याचे लष्कराच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले.
यापूर्वीही ३० ऑगस्टला राजौरीमध्येच सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एका जेसीओला वीरमरण प्राप्त झाले होते. नौशेरा भागामध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून येताच, तपास सुरू केला असता सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये एक जेसीओ जखमी झाला होता, त्यानंतर उपचारांदरम्यान त्याला वीरमरण प्राप्त झाले अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या महिन्यापासूनच कुपवाडा, पूंच, पीर पंजाल आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. तसेच २६ ऑगस्टला पाकिस्तानने शाहपूर, किर्नी आणि कसबा भागांमध्येही गोळीबार केला होता.
हेही वाचा : भारत-चीन सीमावाद : आज पार पडणार ब्रिगेड कमांडर लेव्हलची बैठक