श्रीनगर - केंद्रसरकारने कलम ३७० रद्द करण्यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षातील नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. या नेत्यांमधील तीन नेत्यांची आज सुटका करण्यात येणार आहे. यावर मीर, नूर मोहम्मद आणि शोहेब लोन यांना विविध अटींसह, बाँडवर स्वाक्षरी घेऊन सोडण्यात येणार आहे.
मीर हे पीडीपीचे माजी आमदार आहेत. तर, शोहेब लोन हे काँग्रेसकडून उत्तर काश्मीरमधील उमेदवार होते. निवडणूक हरल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. पीपल्स कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष सज्जद लोन यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. नूर मोहम्मद हे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना सोडून देण्यापूर्वी, त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाची आणि शांततेची हमी देणाऱ्या प्रतिज्ञात्रावर सही घेण्यात येणार आहे.
याआधी पीपल्स कॉन्फरन्सचे इम्रान अन्सारी यांच्यासह सईद अखून यांना प्रकृतीच्या कारणावरून सोडून देण्यात आले होते.
५ ऑगस्टला केंद्रसरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हजारहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांच्यासह जम्मू आणि काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांचादेखील (फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती) समावेश होता.
हेही वाचा : छत्तीसगडमध्ये सुरू झाला देशातील पहिला 'गार्बेज कॅफे'...