नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ विद्यापीठाकडून सार्वजनिक केलेला नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने रविवारी दिले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये काही निमलष्करी आणि गणवेशातील पोलीस अचानकपणे येऊन विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
हा ४८ सेकंदांचा व्हिडिओ १५ डिसेंबरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज असून यात सात-आठ गणवेशातील लोक जण विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
'जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठीच्या डॉ. झाकीर हुसेन लायब्ररीमध्ये पोलीस विद्यार्थ्यांना क्रूरपणे मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, असे आमच्या निदर्शनास आले आहे. मात्र, अशा प्रकारचा व्हिडिओ विद्यापीठाकडून प्रसारित करण्यात आलेला नाही,' असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अझीम यांनी सांगितले आहे.
काय झाले होते 15 डिसेंबरला ?
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात 15 डिसेंबरला सीएएविरोधी आंदोलन सुरु होते. त्यावेळी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली. पोलिसांनी विनापरवानगी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटना केला होता. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. विद्यापीठातील आंदोलनानंतर देशभरात त्याचे प्रतिसाद उमटले होते.