नवी दिल्ली : गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जल जीवन मोहीमेची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत आजपर्यंत सुमारे पाच कोटी घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन दिले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
३.५५ लाख कोटींच्या या योजनेमार्फत, दरडोई दररोज ५५ लिटर पाणी पुरवण्याची खात्री करण्यात येईल असे पंतप्रधानांनी जाहीर केले होते. तसेच यामध्ये पाण्याचे नवीन कनेक्शन बसवणे, जुने दुरुस्त करणे आणि गावोगावी जलसाठे तयार करणे याचाही समावेश होता.
भारत सरकारचे लक्ष्य २०२४पर्यंत देशातील सर्व (१८.९३३ कोटी) घरांमध्ये नळाचे कनेक्शन देणे आहे. या मोहीमेंतर्गत गेल्या एका वर्षात ४.९४६ कोटी घरांमध्ये नळ बसवण्यात आले आहेत, अशी माहिती जल शक्ती मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यनिहाय आकडेवारी पाहता, गुजरातमध्ये सर्वाधिक (६६.२१ लाख) कुटुंबांना याचा फायदा झाला. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा (५३.८८ लाख घरे) क्रमांक लागतो. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा सारखी उत्तरेकडील राज्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात पुढे आहेत. तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश सारख्या दाक्षिणात्य राज्यांनी आता याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्थलांतरीत मजूर आपापल्या राज्यांमध्ये परतले होते. त्यानंतर त्यांच्याही मदतीने घराघरांमध्ये पाण्याचे कनेक्शन पोहोचवण्यात आले. लॉकडाऊन कालावधीमध्ये सुमारे एक लाख घरांना पाण्याचे कनेक्शन दिल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.