नवी दिल्ली - ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील वार्षिक रथयात्रा 23 जूनला होणार होती, या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मंदिराच्या आवारात रथयात्रेचे आयोजन करण्याच्या शक्यतेबाबत चर्चा करण्यासाठी जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे.
दिब्यसिंह देब यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा काळजीपूर्वक अभ्यास केला जाईल. तसचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आणि मंदिरातच सर्व विधी पार पाडण्याच्या शक्यतेवर विचार केला जाईल, असे रामचंद्र दासमोहापात्र म्हणाले.
दरम्यान, बैठकीनंतर एक शिष्टमंडळ पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची भेट घेईल आणि या संदर्भात त्यांचा सल्ला घेईल. शंकराचार्य यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे दासमोहापात्र यांनी सांगितले.
जगन्नाथ रथयात्रेवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर ओडिशा सरकारने मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाला या निर्णयाचे पालन करण्यात सांगितले आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्याचे सांगितले.
रथयात्रेशी संबंधित परंपरा मंदिरामध्येच पूर्ण करून घ्याव्यात, असे सरकारने सांगितले आहे. तसेच पुरी येथे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात 12 तासांचा बंद ठेवण्यात आला आहे.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रथयात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात श्रीजगन्नाथ सेना आणि श्रीक्षेत्र सुरक्षा वाहिनी नावाच्या दोन संघटनांनी पुरी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. आज सकाळी 6 पासून पुरी शहर बंद आहे.