श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर कित्येक राजकीय नेत्यांना कैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने त्या नेत्यांची सुटका करण्यात येत आहे. आज (गुरुवारी) आणखी पाच नेत्यांना कैदेतून मुक्त करण्यात आले आहे.
सलमान सागर (एनसी), निझामुद्दीन भट (पीडीपी), शौकत गानई (एनसी), अलताफ कल्लू (एनसी) आणि मुक्तियार बाबा (पीडीपी) या नेत्यांची सुटका करण्यात आली आहे. यापूर्वी १० जानेवारीला नागरी सुरक्षा कायद्याअंतर्गत ज्या नेत्यांना कैदेत ठेवण्यात आले होते, अशा २६ नेत्यांविरोधातील वॉरंट मागे घेण्यात आले होते. तसेच डिसेंबरमध्येही काही नेत्यांची सुटका करण्यात आली होती.
नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्षाचे प्रमुख फारूख अब्दुल्ला, त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांसह अनेक नेत्यांना कलम ३७० रद्द करण्याअगोदर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत कैदेत ठेवण्यात आले होते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारमधील ३६ मंत्री प्रथमच काश्मीर दौरा करणार आहेत. १८ आणि २४ जानेवारी दरम्यान सरकारमधील ३६ मंत्री जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विविध ५९ ठिकाणी भेटी देणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचा : निर्भया प्रकरण : आरोपींच्या फाशीसाठी नवी तारीख जाहीर करा; तिहार तुरूंग प्रशासनाची मागणी