श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये असणाऱ्या सहा मुघलकालीन उद्यानांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारशांमध्ये होणार आहे. यासाठी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सोमवारी याबाबत माहिती देण्यात आली.
यापूर्वी सिन्हांनीही या उद्यानांच्या पुनःस्थापनेच्या कार्याला वेग देण्याबाबत सूचना केल्या होत्या. मुघल काळातील या उद्यानांची पुनःस्थापना करण्याबाबत प्रशासन वेगाने काम करत आहे. निशांत, शालीमार, चश्माशाही, परी महाल, अचबल, आणि वीरिनाग ही या सहा उद्यानांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरच्या फ्लोरिकल्चर विभागाचे संचालक फारुख अहमद रादर यांनी याबाबत माहिती दिली. यांपैकी चार उद्याने ही श्रीनगर शहरात असून, बाकी दोन उद्याने अनंतनाग जिल्ह्यात आहेत.
२००५ ते २०११ दरम्यान जम्मू काश्मीरमधील आठ उद्यानांची पुनःस्थापना करण्यात आली होती. या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आताचे काम सुरू आहे, असे फारुख यांनी सांगितले. २०११मध्येच इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इनटॅक) आणि युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी या आठ उद्यानांची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांपैकी सहा उद्यानांचा समावेश जागतिक वारशांच्या संभाव्य यादीमध्ये करण्यात आला होता.
यानंतर आता जम्मू-काश्मीर प्रशासन यासंदर्भातील कागदपत्रे युनेस्कोला पाठवण्याची तयारी करत आहे. या कागदपत्रांचे युनेस्कोसमोर सादरीकरण होईल. त्यानंतर या उद्यानांचा समावेश जागतिक वारशांच्या यादीत करण्याबाबत निर्णय होईल. या उद्यानांचा समावेश जागतिक वारशामध्ये झाल्यास जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.