श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलीस रुग्णालयात काम करणाऱ्या 2 डॉक्टरांची कोविड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शनिवारी हे रुग्णालय तात्पुरते बंद करण्यात आले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
श्रीनगरच्या बाटमलू भागातील जम्मू-काश्मीर पोलीस रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) काम करत असलेल्या 2 दंतवैद्यकीय डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनाचे निदान झाले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बिलाल राजा यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना दिली.
ते म्हणाले, "सध्या रूग्णालयातील सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे स्वॅबचे नमुने घेणे सुरू आहे. सध्या ओपीडी बंद असून कोरोना चाचणीचे अहवाल आल्यानंतर पुन्हा हे रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 3324 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 2202 सक्रिय पॉझिटिव्ह रूग्ण होते. तर आता पर्यंत 1086 रूग्ण बरे झाले असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिली.