नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर अनेक नागरिक कोरोना नियमांचे उल्लघंन करत असल्याचे दिसत आहे. सिक्कीममधील इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) पथकाने कोरोनाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी सीमेशेजारील गावांमध्ये सायकल मोहीम काढली. या मोहिमेअंतर्गत 218 किलोमीटर अंतर 20 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
आयटीबीपी पथक सीमावर्ती भागात कोरोनाविषयी जनजागृती करीत आहे. तसेच वैद्यकीय शिबिरांचे आयोजनही करीत आहे. या मोहिमेअंतर्गत आयटीबीपी पथक स्थानिक तरुणांना इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस भरतीबाबतही माहिती देणार आहे. 18 सदस्यांचे हे पथक असून असून त्यात प्रशिक्षित गिर्यरोहकही आहेत. आयटीबीपीने आतापर्यंत 215 मोहिमा पार पडल्या आहेत.
भारत-तिबेट सीमा पोलीस दल भारताचे एक सुरक्षा दल आहे. 1962च्या भारत-चीन युद्धानंतर 24 ऑक्टोबर, 1962 रोजी या दलाची स्थापना झाली. लडाखमधील काराकोरमपासून अरुणाचल प्रदेशातील दिफुलापर्यंतच्या 3488 किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते. येत्या 28 ऑक्टोबरला आयटीबीपी स्थापनेला 58 वर्ष पूर्ण होत आहेत.