बंगळुरू - भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) बहुचर्चित अशा 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून रशियामध्ये हे प्रशिक्षण सुरू होईल. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी याबाबत माहिती दिली.
काय आहे 'गगनयान' मोहीम..?
अवकाशात अंतराळवीर पाठवण्यासाठी इस्रो गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहे. या मोहिमेसाठी कधी तांत्रिक अडथळे आले, तर कधी निधीची कमतरता. या सर्व अडथळ्यांनंतर, अखेर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात या मोहिमेला सरकारकडून परवानगी मिळाली. तसेच, १० हजार कोटींचा निधीदेखील इस्रोला देण्यात आला. त्यानंतर महिनाभरातच इस्रोने बंगळुरूमध्ये मानवी अंतराळ उड्डाण केंद्राची (ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर) स्थापना केली.
या मोहिमेअंतर्गत, तीन अंतराळवीरांना सात दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. २०२१च्या डिसेंबर मध्ये ही मोहीम राबवण्याचा इस्रोचा मानस आहे.
दरम्यान, कालच (बुधवार) इस्रोचे प्रमुख सिवन यांनी सरकारने 'चांद्रयान-३' मोहिमेला परवानगी दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी अंतराळावर राज्य करण्यासाठी 'इस्रो' सज्ज झाले आहे, हे नक्की.
हेही वाचा : 'चांद्रयान-३' ची तयारी सुरू, नववर्षात इस्रो करणार नव्या दमाने चंद्रावर स्वारी!