नवी दिल्ली - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेतील कलमुनाई येथे शुक्रवारी झालेल्या आत्मघातीस्फोटाची जबाबदारी घेतली आहे. हा आत्मघाती स्फोट करणारे तिघे आत्मघातकी हे आपल्याच संघटेचे असल्याचे इस्लामिक स्टेटने कबूल केले आहे.
एका वृत्तानुसार कलमुनाई येथे झालेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला. यात सहा लहान मुलांचादेखील समावेश आहे. श्रीलंकेच्या पूर्व भागातील कलमुनाई येथे जिहादी लपले होते. मृत झालेल्या १५ जणांपैकी सहा जण हे दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावरुन बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा गणवेश, त्यांचा झेंडा एका घरातून जप्त करण्यात आला.
मृत झालेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. मोहम्मद नियास असे या संशयित दहशतवाद्यांचे नाव असून तो स्थानिक नॅशनल तोहीद जमात या संघटनेचा असल्याचे सांगितले जात आहे.
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या सहा दिवसानंतर कलमुनाई येथे हा हल्ला झाला. कलमुनाई शहरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरुन सुरक्षा यंत्रणेने तपासणी करत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही गोळीबार केला. यावेळी तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी स्वत: उडवून लावले. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता.