लखनऊ : अयोध्यातील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात आज अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. न्यायाधीश सुरेंद्र यादव हे याप्रकरणी निकाल जाहीर करतील. जर याप्रकरणातील आरोपींना शिक्षा जाहीर झाली तर, त्या परिस्थितीत काही आरोपींनी आधीपासूनच आपले जामीन अर्ज तयार ठेवले आहेत. आरोपींचे वकील के.के. मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.
न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह आणि इतर आरोपींचे वकीलपत्र के.के. मिश्रा यांनी घेतले आहे. या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा जाहीर होण्याची शक्यता गृहित धरून त्यांचे अंतरिम जामीन अर्ज तयार ठेवण्यात आले आहेत. पाच वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यास त्वरित जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मिश्रांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने निर्णय जाहीर केल्यानंतर शिक्षेविरुद्ध ९० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. त्यामुळेच जामीन अर्ज तयार ठेवण्यात आले आहेत. शिक्षा जाहीर झाली, तर आम्ही नक्कीच उच्च न्यायालयात जाऊ, असे भाजपाचे नेते विनय कटियार यांनी म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर त्वरित न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांनी एक तात्पुरता तुरुंगही तयार केला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर या प्रकरणी निकाल जाहीर केला जाणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
हेही वाचा : मरणानंतरही 'तिची' फरपट; वडिलांना घरात बंद करत पोलिसांनी रात्रीच केले घाई-घाईत अंत्यसंस्कार