मुरादाबाद (उत्तर प्रदेश) - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. वडिलांचे शिलाईचे दुकान बंद झाल्याने दहा वर्षांची एक मुलगी मास्क विकत आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे.
घरी बनवलेले मास्क घेऊन ही मुलगी रोज सायकलने प्रवास करून त्याची विक्री करते. त्यातून तिला केवळ पन्नास ते शंभर रुपये दिवसाकाठी मिळतात. कोरोनाशी सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर ती मोफत मास्क देण्याची तयारी दर्शवते. मात्र, तिची परिस्थिती पाहून कोणीही मोफत मास्क घेत नाही.
या मुलीचे नाव गुलसफा असे असून ती मझोला ठाणे क्षेत्रातील जयंतीपूरच्या मीनानगरमध्ये राहते. गेल्या आठवड्यापासून तिच्या घरातील लोक तिहेरी मास्क बनवतात आणि त्याची ती रस्त्यावर विक्री करते. तिचे वडील इंतजात हुसेन शिलाईचे काम करून उदरनिर्वाह करायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे दुकान बंद आहे. त्यामुळे ते आणि घरातील इतर लोक आता मास्क बनवत आहेत.
वडिलांचे शिलाईचे काम बंद झाले आहे. त्यामुळे घरी आर्थिक चणचण भासते. आई-वडील घरी बसून मास्क बनवतात आणि मी बाहेर रस्त्यावर ते विकते, असे गुलसफा 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाली. कोणी दोन मास्क घेतले तर मी ते पंधरा रुपयातसुद्धा देते. मास्क विकून रोज पन्नास ते शंभर रुपये मिळतात, ते मी वडिलांना नेऊन देते. लॉकडाऊनमुळे त्यांचे काम बंद आहे, म्हणून सध्या आम्ही हे काम करतोय, असेही ती म्हणाली.