रायपूर - छत्तीसगड राज्यातील अम्बिकापूर महापालिका म्हणजे स्वच्छता आणि सेवा याचे उत्तम उदाहरण आहे. या महापालिकेद्वारे शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी 'सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट'चा प्रकल्प राबवला जातो. मात्र, आता त्यासोबतच 'गारबेज कॅफे' प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याद्वारे गरिबांना जेवण देखील मोफत दिले जाणार आहे. मात्र, त्यासाठी रस्त्यावर पडलेले प्लास्टीक उचलून महापालिकेला द्यायचे आहेत. त्याच्या वजनानुसार त्या व्यक्तीला जेवण दिले जाणार आहे. त्याद्वारे जनतेच्या सेवेबरोबरच शहराची स्वच्छता देखील राखली जाणार आहे.
गेल्या २०१५ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सॉलीस वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्याद्वारे शहरातील ओला कचरा-सुखा कचरा गोळा करण्यात आला. तसेच या कचऱ्यावर प्रक्रिया करून नफा देखील मिळवला. एवढेच नाहीतर याद्वारे महिलांना स्वयंरोजगार सुद्धा उपलब्ध करून दिले. यासाठी या महापालिकेला पुरस्कार देखील मिळाला आहे.
स्वच्छतेबरोबरच आता ही अम्बिकापूर महापालिका गरिबांची सेवा करण्याकडे वळली आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून गरीब जनतेची सेवा केली जाणार आहे. त्यासाठी एक 'कचरा कॅफे' सुरू करण्यात येणार आहे. मात्र, हा कॅफे सर्वसाधारण कॅफेपेक्षा अगदी उलट आहे. याठिकाणी एक रुपया न घेता नाश्ता आणि जेवण दिले जाणार आहे. मात्र, यासाठी नागरिकांना श्रमदान करावे लागणार आहे. त्यासाठी रस्त्यावर पडलेले प्लास्टीक उचलून महापालिकेच्या सेग्रीगेशन विभागाला द्यायचे आहे. त्याठिकाणी त्या प्लास्टीकचे वजन करून त्यानुसार कुपन देण्यात येईल. एक किलो प्लास्टीक नेल्यास जेवणाचे कूपन मिळेल, तर अर्धा किलो प्लास्टीक दिल्यास नाश्त्याचे कूपन मिळणार आहे. त्यानंतर हे कूपन घेऊन अम्बिकापूर बसस्थानकावर तयार करण्यात येणाऱ्या कचरा कॅफेमध्ये जावे लागणार. त्याठिकाणी मोफत नाश्ता आणि जेवण मिळणार आहे. हा भारतातील पहिला कचरा कॅफे असणार आहे.
गारबेज कॅफेद्वारे महिलांना रोजगार -
अनेक महिला बसस्थानकावर आपले लहान-मोठे व्यवसाय चालवत होत्या. मात्र, आता या महिला महापालिकेचा कचरा कॅफे चालवणार आहेत. नगरपरिषद या महिलांना प्रत्येक ग्राहकाला देण्यात येणाऱ्या नाश्ता आणि जेवणाचे पैसे देणार आहे. त्याद्वारे त्यांना चांगला नफा मिळणार आहे. सध्या नगरपरिषदेने या महिलांना ६ लाख रुपये रक्कम दिली आहे. गरजेनुसार पुन्हा त्यांना पैसे पुरवले जाणार आहे.
प्लास्टीकद्वारेच निघणार गारबेज कॅफेचा खर्च -
महापालिकेने गारबेज कॅफेच्या प्रकल्पासाठी सुरुवातीला पैसे खर्च केले आहेत. मात्र, महापालिकेच्या सेग्रीगेशन सेंटरमध्ये जमा झालेले प्लास्टीक बाजारामध्ये विकले जाणार आहे. त्याद्वारे महापालिकेला पैसे मिळणार आहेत. यामधूनच हे कचरा कॅफे चालवले जाणार आहे. अशाप्रकारे अम्बिकापूर महापालिकेने स्वच्छता आणि सेवा याची सांगड घालत सर्वांसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.