नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. गेल्या २४ तासात भारतात एकूण ७५ हजार ७६० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा ३३ लाख १० हजार २३५ इतका झाला आहे.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंताजनक बाब आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे तब्बल १ हजार २३ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकेडवारीसोबत देशातील एकूण मृतांचा आकडा हा ६० हजार ४७२ इतका झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २५ लाख २३ हजार ७७२ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर सध्य स्थितीत ७ लाख २५ हजार ९९१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात सध्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रात बुधवारी (२६ ऑगस्ट) सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.