नवी दिल्ली - पाकिस्तानी लष्कराने वर्षभरात तब्बल २०५० वेळा भारत-पाक सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारताकडून यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पाक लष्कराने केलेल्या या हल्ल्यांमध्ये २१ भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत.
'पाकिस्तान लष्कराकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविषयी आम्ही चिंता व्यक्त केली आहे. तसेच, सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांना उघड पाठिंबा दिल्याविषयीही पाकवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिकांना आणि सीमेवरील भारतीय तळांना लक्ष्य करण्यात आले आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'तुमच्या देशातील अल्पसंख्याकांच्या छळाविषयी बोला'; भाजप खासदाराची मलालावर आगपाखड
'या वर्षी पाकने विनाकारण २०५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात २१ भारतीय ठार झाले. आम्ही वारंवार पाकिस्तानला २००३ मध्ये झालेल्या शस्त्रसंधी कराराची आठवण करून देत आहोत. तसेच, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत,' असे त्यांनी म्हटले आहे. भारताने पाककडून होणार बहुतेक हल्ले परतवून लावले आहेत. तसेच, दहशतवाद्यांनी केलेले घुसखोरीचे प्रयत्नही अनेकदा हाणून पाडले आहेत, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह