ग्वाल्हेर - जगभरात कोरोना विषाणुमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्वाल्हेरची एक मुलगी इटलीत अडकली आहे. वैभवी व्यास असे या मुलीचे नाव आहे. वैभवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे. वैभवी टेरमो विद्यापीठात एमबीए करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये ग्वाल्हेरहून इटलीला गेली होती.
कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या भीतीने गेल्या 27 दिवसांपासून हॉस्टेलबाहेर निघाली नसल्याचे वैभवीने व्हिडीओत सांगितले आहे. चहूबाजुला मृत्यूने हाहाकार माजवला आहे. वैभवीसोबतच काश्मिरची एक विद्यार्थिनी तिरथ आणि हैदराबादचे दोन विद्यार्थी क्रिस्टो आणि यशवंतदेखील तिच्यासोबत तिथे अडकले आहेत. दिवसेंदिवस गंभीर होत जाणाऱ्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना भारतात परतायचे आहे.