ह्यूस्टन/नवी दिल्ली - अमेरिकेतील टेक्सास राज्यात भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची ट्रॅफिक सिग्नलवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. संदीप सिंह धालीवाल असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते अमेरिकन पोलीस दलात कार्यरत होते.
धालीवाल यांनी रस्त्यात एक वाहन अडवले होते. यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होता. वाहन अडवल्यानंतर या पुरुषाने धालीवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर धालीवाल यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर येथील एका मॉलच्या दिशेने गेला. धालीवाल यांच्याकडे कॅमेरा होता. त्यामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडण्याच्या प्रकाराचा व्हिडिओ तयार झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हल्लेखोराची ओळख पटवण्यात आली आहे.
धालीवाल या एजन्सीचे पहिले शीख अधिकारी होते. ते टेक्सासमध्ये शीख धर्मातील दाढी आणि पगडी या मान्यतांसह सेवा बजावणारेही पहिलेच अधिकारी होते. सांस्कृतिक विविधता जपण्याच्या उद्देशाने त्यांना दाढी आणि पगडीसह सेवा बजावण्याची विशेष अनुमती देण्यात आली होती. ते विवाहित होते आणि त्यांना तीन मुले आहेत.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धालीवाल यांच्याजवळच्या डॅशकॅममध्ये (एक प्रकारचा कॅमरा) संशयिताचा हल्लेखोराचा चेहरा दिसला. तो जे वाहन चालवत होता, तेही ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्याच्यासोबतच्या महिलेला पकडण्यात आले. यानंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तिलाही अटक करण्यात आली. त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
संदीप धालीवाल हे पोलीस दलातील पोलीस दलाव्यतिरिक्तही सामान्य लोकांमध्येही परिचयाचे होते. त्यांनी आतापर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला होता. तसेच 2015 मध्ये शीख पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात त्यांनी रेकॉर्डही केला होता. शीख समुदाला एकत्र ठेवण्यासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. मागील काही वर्षांत अमेरिकेसह इतरही विकसित देशांमध्ये वर्णद्वेषी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा बेरोजगारी आणि इतर कारणांनी आलेल्या नैराश्यांमुळे असे हल्ले होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच, अनेक देशांमध्ये वैयक्तिक शस्त्र बाळगण्याचे कायदे फारसे कठोर नसल्यामुळेही या हल्लेखोरांना सहज शस्त्रे उपलब्ध होत असून यामुळेही हल्ल्यांमध्ये वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.