नवी दिल्ली - चीन आणि भारतामध्ये पूर्वच्या भागामध्ये तणावाची स्थिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय सैन्य दलाचे पथक चुशूलमध्ये तयारी करत आहेत. हे पथक पुढील आठवड्यात चीनच्या सैन्याबरोबर चर्चा करणार आहे.
भारतीय सैन्यदलाच्या पथकाला सैन्यदलाचे मुख्यालय आणि सरकारी अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याबाबत काही सूचना आणि निर्देश दिले आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यदलाच्या कमांडरमध्ये 6 जूनला बैठक पार पडली होती. या बैठकीत भारतीय कॉर्पस कमांडर लेफ्टनंट जनरल हरविंदर सिंग हे सहभागी झाले होते. या बैठकीतून फारसे साध्य झाले नाही. दोन्ही देशांचे सैनिक सीमारेषेवर आमनेसामने ठाकले आहेत. तरीही दोन्ही देशांनी राजनैतिक आणि सैन्याची चर्चा सुरू ठेवण्याची तयारी दाखविली आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सहा जूनची बैठक ही खूप सकारात्मक असल्याचे म्हटले होते. देशाचे नेतृत्व हे खूप बळकट हातात आहे. आम्ही देशाचा स्वाभिमान आणि अभिमान यामध्ये तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. गेल्या महिन्यात चीनने पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष सीमारेषेजवळ बांधकाम सुरू केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनने त्या भागात मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही त्या भागात मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. गेले दोन महिने चीन आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे.