नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला असून त्याचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा स्थगीत करण्यात आली आहे. उद्या रात्री 12 वाजल्यापासून 31 डिसेंबरपर्यंत स्थगीत केली आहे.
अनेक देशांच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ब्रिटनच्या काही भागांमध्ये पुन्हा 30 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन घोषीत केला आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या प्रसारामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. त्यामुळे यूरोपीय यूनियनच्या काही देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी आणली आहे. फ्रान्स, जर्मनी, ईटली आदी देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी लावली आहे.
ब्रिटनमधील कोरोना रुग्णसंख्या -
ब्रिटनमध्ये 20 लाख 40 हजार 147 कोरोना रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. तर 67 हजार 401 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात एकूण 7 कोटी 71 लाख 72 हजार 373 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 16 लाख 99 हजार 644 जणांचा बळी गेला आहे. तर 5 कोटी 40 लाख 89 हजार 680 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रातील नेत्यांची विमानसेवा स्थगित करण्याची मागणी -
ब्रिटनमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता, महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालावी. तसेच कोरोना विषाणूच्या नव्या संसर्गावर स्पष्टता येईपर्यंत इंग्लंडमधून येणारी विमानसेवा केंद्र सरकारने तात्काळ स्थगित करावी. तिकडून आलेल्या सर्व प्रवाशांना अलगीकरणात ठेवावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हीच मागणी केली होती.
जगभर भीतीचे वातावरण -
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व देशांनी लॉकडाऊन केले होते. त्यानंतर सावरत असतानाच आणि कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असताना इंग्लंडमधील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू आऊट ऑफ कंट्रोल असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी तेथील संसदेत सांगितले आहे. यामुळे युरोपमधील इतर देशांनी सतर्कता दाखवत इंग्लंडमधून येणार्या हवाई वाहतुकीसह बोटीद्वारे होणार्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.
हेही वाचा - ऐतिहासिकदृष्ट्या गौतम बौद्ध यांच्या संदेशाचा प्रकाश जगात पसरला'