नवी दिल्ली - भारत- पाकिस्तान सीमेवर ज्या प्रमाणात आपण लक्ष ठेवून आहोत, त्याप्रमाणे चीनबरोबरच्या सीमारेषेवरही सेना नजर ठेवून राहील, असे नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले. भारत चीनबरोबरचा सीमा प्रश्नही सोडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - शोध मोहिमेदरम्यान काश्मीरमध्ये २ जवान हुतात्मा
चीन- पाकिस्तान या दोन्ही देशांबरोबर आपली सीमा असून दोन्हीही सीमा महत्त्वाच्या आहेत. आपण कायमच पश्चिम सीमेवर लक्ष केंद्रित केले. त्याप्रमाणे उत्तर सीमेवरही तेवढेच लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमेवर कार्यक्षमता वाढवण्यासाठी भर देणार असल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तान बरोबरच्या सीमेवरील धोक्यांबाबत रावत म्हणाले, जो काही पाकिस्तानपासून धोका आहे, त्याची सतत माहिती घेण्यात येत आहे. ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. जसा धोका आहे, त्यानुसार कृती केली जाईल, असे नरवणे म्हणाले.
हेही वाचा - 'पाकने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर भारताकडे 'स्ट्राईक' अधिकार'
लष्कराच्या आधुनिकीकरणाबाबत नरवणे म्हणाले, आधुनिकीकरण हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी संभाव्य धोक्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. देशापुढीले धोके कायम बदलत असतात, त्यानुसार नियोजन बदलण्यात येते. मानवी हक्कांना विशेष महत्त्व दिले जाईल, मात्र, भारतीय लष्कर कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. प्रत्येक क्षणी तयार राहण्यास आमचे प्राधान्य असल्याचे नरवणे म्हणाले. मंगळवारी नरवणे यांनी लष्कर प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.