नवी दिल्ली - भारत आणि चीनमधील लडाख येथील सीमेवर काही लष्करी रणनीतीमध्ये दोष आहेत का? याचा अभ्यास भारतीय लष्कराने सुरू केला आहे. लडाख येथील नियंत्रण रेषेवर चीनने लष्कर वाढवले असून पायाभूत सुविधा उभारण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पूर्व लडाखमधील दुर्गम सीमा भागात लष्करातील काही अधिकाऱ्यांनी व्यूहात्मक दोष ठेवले का? ज्यामुळे चीनला फायदा झाला, याचा अभ्यास भारताकडून सुरू करण्यात आला आहे.
लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, रणनीतीत काही चुका झाल्यामुळे भारतीय हद्दीत चिनी सैनिक आले. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येतील. तर दुसऱ्या एका सूत्राने सांगितले की, मागच्या शुक्रवारी पार पडलेल्या तीन दिवसीय आर्मी कमांडर कॉन्फरन्समध्येही सीमाप्रश्न चर्चिला गेला.
युद्धातील उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी व्यूहात्मक आणि रणनीतीचे निर्णय योग्य हवे. विजय मिळण्यासाठी जमीन, समुद्र, हवाई क्षेत्र यातील कोणत्या महत्त्वाच्या ठिकाणी सैनिक तैनात करायचे यावर विजय अवलंबून असतो.
पूर्व लडाखमधील चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये हाणामारी झाल्याचे व्हीडिओही समोर आले आहेत. मात्र, त्यांची सत्यता पडताळण्यात आली नाही. दुर्गम आणि डोंगराळ भूप्रदेश असल्याने सीमारेषा नक्की कोठे आहे, हे समजण्यास अडचणी येतात. त्यातच भारताच्या बाजूने असलेल्या भूप्रदेशात चिनी सैन्याने प्रवेश केला होता. त्यावरून हा वाद सुरू झाला आहे. दोन्ही देशांतील उच्चपातळीवरून हा वाद आता सोडविण्यात येत आहे.