नवी दिल्ली - भारत चीन सिमेजवळ लवकरच हिमविजय युद्धसराव आयोजित करण्यात येणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या या युद्धसरावामध्ये अमेरिकी तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रांचा वापर करण्यात येणार आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये लढण्याासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या '१७ मांऊटन स्ट्राईक कार्पस' ची युद्ध लढण्याची क्षमता या सरावाद्वारे सिद्ध होणार आहे.
४ ते ६ आठवड्यांपर्यंत हा सराव चालणार आहे. या युद्ध सरावामध्ये 'एम ७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा' आणि चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय वायू दलही या सरावामध्ये सहभाग घेणार आहे, त्यामुळे चीन बरोबर युद्धाची वेळ आली तर भारताची तयारी किती असेल, याची चाचणी होणार आहे.
हिमविजय युद्धासरावामध्ये डोंगराळ भागामध्ये खऱ्या युद्धासारखा थरार निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी सैन्यदलाची जोरदार तयारी सुरू आहे. मांऊटन स्ट्राईकचे ५ हजार सैन्य युद्धसरावामध्ये भाग घेणार आहेत. . 'इंटिग्रेटेड बँटल ग्रुप' या सरावामध्ये सहभाग घेणार आहे.
चीनचे सैन्य ईशान्य भारतामध्ये भारतीय सीमेवर अनेक वेळा घुसखोरी करते. भारतीय सैन्य आणि चीनच्या सैन्यामध्ये अनेक वेळा खडाजंगीही झाली आहे. या पार्श्वभुमीवर भारताच्या या सरावाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सरावाद्वारे चीनशी युद्ध करण्याची वेळ आली तर भारताची युद्धक्षमता समजणार आहे.