नवी दिल्ली - देशाच्या भूमीचे संरक्षण करताना बलिदान दिलेल्या जवानांचा देश कायमच ऋणी राहील असे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. लडाखमधील गलवान व्हॅली परिसरात चीनी सैनिकांबरोबर झालेल्या मारहाणीत 20 भारतीय जवानांना विरमरण आले, त्यावर अमित शाह यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
गलवान व्हॅलीत धाडसी जवानांना गमावल्याच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. भारत जवानांच्या सर्वोच्च बदिलानासाठी कायम ऋणी राहील. संपूर्ण भारत आणि मोदी सरकार या दु:खाच्या क्षणी जवानांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे शाह म्हणाले.
भारताची भूमी सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिलेल्या अमर जवानांना संपूर्ण देशाने नमन केले आहे. त्यांच्या धैर्यातून भारताची भूमीप्रतिची कटिबद्धता दिसून येते. ज्या कुटुंबांनी असे हिरो भारतीय लष्कराला दिले, त्यांच्या पुढे मी नतमस्तक आहे, असे शाह म्हणाले. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताला शांतता हवी आहे, मात्र, कोणी खोड काढल्यानंतर चोख उत्तर देण्यात येईल, असे मोदी म्हणाले.