नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचे थैमान पसरत चालले आहे. अशा वेळी जागतिक आरोग्य संस्थेने एकता चाचणीची हाक दिली आहे. यामध्ये भारतदेखील सहभागी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) 'एकता चाचणी'ची घोषणा केली आहे. यामध्ये ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनावर विविध उपचार करणार आहेत. यासाठी जगभरातील रुग्णांची यादृच्छिकरित्या निवड केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये भारतही सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयएमसीआर) दिली आहे.
डब्ल्यूएचओमार्फत भारतात ही चाचणी घेण्यासाठी डॉ. शीला गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. त्या आयएमसीआरच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये संशोधक आहेत.
दरम्यान, आयएमसीआर हे जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या सर्वांसोबत एकत्रितरित्या कोरोनाच्या लसीवर संशोधन करत आहे. यासोबतच कोरोनाची चाचणी करण्यासाठी नवी किट्सही तयार करण्यात येत आहेत.
शुक्रवारपर्यंत भारतामध्ये कोरोनाचे ३,३२२ अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत देशभरात सुमारे ६२ लोकांचा यात बळी गेला आहे.
हेही वाचा : #covid19: आता 60 वर्षांवरील रुग्णांवरच मोठ्या रुग्णालयात होणार उपचार; बीएमसीचा निर्णय