नवी दिल्ली - भारतीय वायू सेनेने रशियाकडून १५०० कोटी रूपयांच्या ‘आर -२७’ या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एका करारवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे भारताच्या हवाई दलाची ताकद वाढणार आहे. सुखोई-३०एमकेआय या विमानांवर ही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत.
मागील ५० दिवसांत भारताने रशियाकडून ७ हजार ६०० कोटी रुपयांची संरक्षण खरेदी केली आहे. हवाई दलाने Spice-2000 या क्षेपणास्त्राची तातडीने खरेदी केली होती. आता भारताची मध्यम आणि लांब पल्ल्यापर्यंत क्षेपणास्त्राद्वारे मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक शस्त्र खरेदीस मंजुरी देण्यात आली होती.
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तिन्ही सेना दलांना तत्काळ संरक्षण खरेदीचे अधिकार दिले आहेत. याअंतर्गत पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेला सुरक्षित करण्यासाठी कितीही खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यात ४४ सीआरपीएफ जवानांना जीव गमवावा लागला होता. यामुळे भारत-पाकदरम्यानच्या तणावात वाढ झाली आहे.