नवी दिल्ली - अयोध्येमध्ये काल (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य समारोहात राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. या सोहळ्यावर पाकिस्तानने टिका केली आहे. त्यास भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने विरोध दर्शवला असून प्रत्युत्तर दिले आहे. जातीयवाद पसरवणारी भावना भडकावणारी वक्तव्ये पाकिस्तानने थांबवावे, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये ढवळाढवळ करू नका, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. 'भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर पाकिस्तानने वक्तव्य जारी केले आहे. त्यांनी भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये नाक खुपसणं बंद करून जातीय चिथावणीखोर वक्तव्य करणे थांबवावे, असा इशारा श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला दिला आहे.
जो देश स्वत: सीमेपलीकडून दहशतवाद पसरवतो, आणि स्वत: च्या देशातील अल्पसंख्याकांना धार्मिक हक्क नाकारतो, त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणं आश्चर्यकारक नाही, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात भारतात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. भारतातील कट्टर हिंदू सरकारकडून भारतातील मुस्लिमांची सांस्कृतीक स्थळे पाडण्यात येत आहेत. त्यांना सुरक्षा देण्याची गरज आहे. जगाने याकडे लक्ष द्यावे, आणि भारतातील अल्पसंख्याकांवरील अत्याचार थांबवावे, असे पाकिस्तानने अधिकृत वक्तव्य जारी करत म्हटले होते.