नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत आतापर्यंतची उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल 32 हजार 695 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 606 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 9 लाख 68 हजार 876 इतका झाला आहे. सध्या 3 लाख 31 हजार 146 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 6 लाख 12 हजार 815 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 24 हजार 915 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 10 हजार 928 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 75 हजार 640 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 12 हजार 99 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 52 हजार 613 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 16 हजार 993 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 487 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात 44 हजार 552 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 79 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 51 हजार 820 कोरोनाबाधित तर 2 हजार 167 जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 12, पश्चिम बंगालमध्ये 1 हजार तर कर्नाटकमध्ये 928 जणांचा बळी गेला आहे.
देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करणाऱया पहिल्या 5 राज्यांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. रुग्णांचे बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण 63.24 टक्क्यांवर पोहोचले आहे
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचार हे एकमेव मार्ग आहेत. आयसीएमआरने संबंधित राज्य सरकार, सार्वजनिक आणि खासगी संस्थांना आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.