नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 357 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 9 हजार 996 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सध्या 2 लाख 86 हजार 579 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1 लाख 41 हजार 29 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 37 हजार 488 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 8 हजार 102 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक रुग्णांचा विचार केला, तर अर्थातच महाराष्ट्रातच अधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 94 हजार 41 वर पोहोचला आहे. 3 हजार 438 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित कुठे?
तामिळनाडूत 36 हजार 841 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 326 जणांचा मृत्यू झाला. तसेच दिल्लीत 32 हजार 810 कोरोना रुग्ण आढळले असून 984 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 21 हजार 521 कोरोनाग्रस्त आहेत. तर 1 हजार 347 जणांचा बळी गेला आहे.
सध्या संसर्गाचा वेग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांसाठी काहीशी दिलासादायक बाब आहे. तसेच कोरोना चाचण्यांचा वेगही वाढला आहे. 11 जूनपर्यंत देशात तब्बल 52 लाख 13 हजार 140 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये देशात 1 लाख 51 हजार 808 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.