नवी दिल्ली : ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या २०२०च्या आकडेवारीनुसार, भारत आता पहिल्या ५० देशांमध्ये आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची झेप घेत, देश आता ४८व्या स्थानी पोहोचला आहे. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)ने आपली वार्षिक आकडेवारी जाहीर केली, त्यात ही बाब समोर आली आहे.
२०१५साली भारत या यादीमध्ये ८१व्या स्थानी, तर २०१८ मध्ये ५२व्या स्थानी होता. विपोच्या अहवालानुसार, दक्षिण आणि मध्य आशियाई भागामध्ये प्रमुख इनोवेशन अचीवर्स म्हणूनही भारताचे नाव पुढे आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या रँकिंगमध्ये सातत्याने सुधारणा दाखवल्यामुळे भारताचा यात समावेश झाला आहे.
सार्वजनिक आणि खासगी संशोधन संस्थांचे कार्य, नवनवे स्टार्टअप्स आणि त्यासाठीचे पोषक वातावरण या सर्वामुळे हे यश मिळाले आहे. तसेच देशभरातील इनोव्हेशनचे विकेंद्रीकरण करण्यासाठी नीती आयोगाने सुरू केलेल्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्सचाही मोठा वाटा आहे. नीती आयोगाने सातत्याने देशाच्या जागतिक क्रमवारीतील स्थितीचा आढावा घेत त्याचा पाठपुरावा केल्याचे हे फळ आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
एकूण १३१ देशांचा अभ्यास आणि विश्लेषण केल्यानंतर विपोने ही यादी जाहीर केली आहे.
हेही वाचा : 'पब्जी'साठी आत्महत्या; अकरावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल