नवी दिल्ली - देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त सीमेवर यंदा मिठाईचे आदान-प्रदान करण्यात आले नाही. पंरपरेनुसार दरवर्षी दिवाळीनिमित्त मिठाईचे आदान-प्रदान होत असते.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल, सैनिकांसोबत साजरी करणार दिवाळी
दिवाळीच्या दिवशीही पाकिस्तानने नियत्रंन रेषेचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी पाकिस्तानने आज आपले हवाई क्षेत्र उघडण्यास नकार दिला आहे.
कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान कावराबावरा झाला आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांच्या महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाच्या रक्षकांकडून मिठाईची देवाणघेवाण होत असते. यावर्षी बकरी ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दोन्ही देशाकडून केल्या जाणाऱ्या मिठाई देवाण-घेवाणीच्या प्रथेमध्ये खंड पडला होता.