नवी दिल्ली - जॉन हॉपकीन्स विद्यापीठाच्या कोरोना ट्रॅकरनुसार, भारतात शनिवारी कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३६ हजार ९५४ हजारांवर पोहोचली. या आकडेवारीसह भारताने इटलीलाही मागे टाकले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, भारत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीमध्ये ६ व्या स्थानावर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासांत देशात ९ हजार ८८७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच आतापर्यंत ६ हजार ६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारताने कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत इटलीला मागे टाकत स्पेनच्या जवळ पोहोचला आहे. सध्या स्पेनमध्ये २ लाख ४० हजार ९७० कोरोनाबाधितांची संख्या आहे. तसेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले देश म्हणजे अमेरिकेत १८ लाख ९७ हजार ८३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापाठोपाठ ब्राझील ६ लाख १४ हजार ९४१, रशिया ४ लाख ४९ हजार २५६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या तीन देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव आहे.
भारतात गेल्या २४ तासांत २९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर एकूण ४ हजार ६११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर ४८.२० टक्के आहे. तसेच एकूण १ लाख १५ हजार ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत १ लाख १४ हजार ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पण कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला नाही. १.३ बिलियन लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाचे आकडे मोठे दिसत असले, तरी इतक्या मोठ्या आकाराच्या देशासाठी हे आकडेवारी अद्यापही सामान्य आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. त्या शुक्रवारी जिनेव्हा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.