नवी दिल्ली - भारताने मानव केंद्रीत विकासासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरासाठी 'ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या संघटनेचा सदस्य बनला आहे. भारत या संघटनेचा सहसंस्थापकही आहे, यासंबधी सरकारने अधिकृत पत्रक जारी केले आहे. याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि विकास केला जाणार आहे.
जगातील आघाडीचे देशांचाही या संघटनेत समावेश आहे. अमेरिका, इंग्लड, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, मेक्सिको, न्युझिलँड, रिपब्लिक ऑफ कोरिया आणि सिंगापूरसारखे देश या संघटनेचे सदस्य आहेत.
जीपीएआय ही एक आंतरराष्ट्रीय आणि अनेक भागीदार असलेली संघटना आहे. जबाबदारपणे विकास, कृत्रिम बुद्घिमत्तेचा विकास, मानवी हक्कांचा समावेश, समावेशकता, बहुविधता, अविष्कार आणि आर्थिक विकास ही तत्वे या संघटनेच्या स्थापनेत अंतर्भूत आहेत, असे पत्रकामध्ये म्हटले आहे.
या संघटनेद्वारे अत्याधुनिक संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबधित विकासाच्या कामांना चालना देण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारे, शैक्षणिक संस्था यांची एकत्र मोट बांधण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोरोना संकटावरही कशी मात करता येईल, यावर काम होणार आहे.
भारताने नुकतीच कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबधीत योजना जारी केली असून एआय(AI) पोर्टलही सुरू केले आहे. शिक्षण, कृषी, आरोग्य, अर्थ, दूरसंचार आणि ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.