नवी दिल्ली - 'इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'नुसार लोकशाही निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत भारत दहा स्थानांनी घसरून 51व्या स्थानावर आला आहे. देशात घटते नागरी स्वातंत्र्य हे यामागील मुख्य कारण असल्याचेदेखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या क्रमवारीत भारताला 6.90 गुण मिळाले आहेत. 2018 मध्ये भारताला मिळालेले गुण 7.23 होते. निवडणूक प्रक्रिया, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती, आणि नागरी स्वातंत्र्य या निकषांच्या आधारे हे गुण दिले जातात. या गुणांच्या आधारे देशांना चार मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकृत करण्यात येते. ज्या देशांना 8 पेक्षा अधिक गुण आहेत त्यांना संपूर्ण लोकशाही राष्ट्र म्हटले जाते. 6 पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना सदोष लेकशाही म्हटले जाते. चार पेक्षा जास्त गुण असणाऱ्या देशांमध्ये संकरित लोकशाही तर चार पेक्षा कमी गुण असणाऱ्या देशांमध्ये हुकूमशाही राजवट असल्याचा निष्कर्ष काढला जातो.
जागतिक पातळीवर भारत सदोष लेकशाही असलेल्या राष्ट्रांमध्ये मोडला जात आहे. 2018 मध्ये भात 42व्या स्थानावर होता. तर, त्यापूर्वी 2017मध्ये 32व्या स्थानवर होता. नॉर्वे देशाने या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. तर, उत्तर कोरिया सर्वात शेवटी म्हणजेच 167 व्या स्थानावर आहे.