नवी दिल्ली - सीमावर्ती भागातील तणावानंतर नेपाळ आणि भारतादरम्यान आत जन्मस्थळांवरून वाद निर्माण होत आहे. दोन्ही देशांदरम्यान अयोध्येनंतर आता गौतम बुद्धांवरून वाद निर्माण झाला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध हे भारतीय असल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. त्यावर आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'शनिवारी एका कार्यक्रमात परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली टिप्पणी ही आपल्या सामायिक बौद्ध वारशाबद्दल होती. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला यात शंका नाही', असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी आज स्पष्ट केले.
काय प्रकरण ?
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमाला महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध यांना भारतीय असल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळने आक्षेप घेतला आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी आपली बाजू मांडली. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतात नव्हे, तर नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. बुद्धांचं जन्मस्थळ युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीतील स्थळांपैकी एक आहे. तसेच नेपाळ हा शांतता प्रिय देश आहे. जिथे बुद्धांचा जन्म झाला, असं 2014 च्या नेपाळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणाले होते, असे नेपाळनं म्हटलं आहे.
राम जन्मस्थळावरून वाद -
भारतात असलेली अयोध्या ही बनावट असून प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते, असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी केलं होतं. भारतात असलेली अयोध्या खरीखुरी नाही, असा दावा ओली यांनी केला होता. तसेच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही ओली यांनी केला होता.